लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असून, ३१ जुलै २०१७ ही या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा पीक विमा हप्ता भरून घेऊन त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभाग, विमा कंपनी व बँकांनी समन्वयातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजना समन्वय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांच्यासह अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ओरिएन्टल विमा कंपनीचे प्रतिनिधी, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई देऊन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. पावसाच्या खंड काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाईसुद्धा या योजनेतून मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणारी आहे. कृषी विभाग व ओरिएन्टल विमा कंपनीने या योजनेमुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाई विषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. याकरिता कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांची मदत घ्यावी. ही विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे; मात्र बिगर कर्जदार शेतकरीसुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच कुळाने जमीन करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. प्रधानमंत्री विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये, याकरिता यावर्षीपासून जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये विमा हप्ता स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमा हप्ता भरताना आधारकार्ड अनिवार्य असून, आधारकार्ड नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती व मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉब कार्ड, वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न करण्यासाठी शेतकरी बँकेत आल्यानंतर बँकांनी आधार कार्ड लिंकिंगची कार्यवाही तातडीने पूर्ण करून सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयीच्या माहितीचे व या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीच्या माहितीचे सादरीकरण केले.अशी आहे संरक्षित विमा रक्कम, पीक विमा हप्ताप्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सोयाबीन पिकासाठी संरक्षित विमा रक्कम प्रति हेक्टरी ४० हजार रुपये, कापूस पिकासाठी ४० हजार रुपये, भुईमूग आणि तुरीसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये, मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी १८ हजार रुपये, खरीप ज्वारीसाठी २४ हजार रुपये व तीळ पिकासाठी २२ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी ८०० रुपये, कापूस पिकासाठी २ हजार रुपये, भुईमुग आणि तुरीसाठी प्रत्येकी ६०० रुपये, मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी ३६० रुपये, खरीप ज्वारीसाठी ४८० रुपये, तीळ पिकासाठी ४४० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
पीक विमा योजनेत सहभागी व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:14 AM