लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पानूबाई जाधव यांच्या ‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानात सुरू असलेल्या जुगारावर वाशिम पोलिसांनी ९ जुलै रोजी धाड टाकली. या कारवाईत ११ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.समाजकल्याण सभापती जाधव यांना सिव्हिल लाइन परिसरात ‘सिंहगड’ नावाने शासकीय निवासस्थान देण्यात आले. मात्र, त्यात दररोज जुगार चालत असल्याची माहिती नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार पाटकर यांना मिळाली. त्याआधारे पाटकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संजय शिपणे, राहुल जगदाळे, उमाकांत केदारे, प्रशांत अंभोरे, राजेश बायस्कर, ज्ञानदेव म्हात्रे, गजानन कऱ्हाळे, ज्ञानबा खिल्लारे यांचा समावेश असलेले पथक घेऊन निवासस्थानावर धाड टाकली. यावेळी तेथे ११ इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. याप्रकरणी ज्ञानेश्वर येवले, भगवान नारायण आढाव (रा. ब्राह्मणवाडा), संजय पुंडलीक हिरवे, बबन विठ्ठल हिरवे (रा. वाशिम), सुरेश आत्माराम ठोंबे, विलास शालिग्राम ठोंबे (रा. जांभरूण), पांडूरंग रामचंद्र वाणी (रा. माळेगाव), राजेश माणिक जाधव (रा. देगाव), संजय ग्यानुजी कांबळे (रा. पार्डी टकमोर), अरूण काशिराम चौधरी (रा. माळेगाव) आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा चौधरी यांचे पती नीळकंठ चौधरी आदींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्हा परिषद सभापतींच्या निवासस्थानातील जुगारावर धाड!
By admin | Published: July 10, 2017 2:05 AM