संतोष वानखडे
वाशिम : आर्थिक वर्ष संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. जुलै महिना उजाडत असतानाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा ‘मार्च एण्डिंग’ संपत नसल्याने उलटसुलट चर्चेला जिल्हा परिषदेत पेव फुटले आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला शासनाकडून विविध माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. या निधीतून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. वाशिम जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे अंदाजपत्रक जवळपास दहा कोटींच्या घरात असते. या निधीतून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचविणे शक्यच नाही. स्वनिधीबरोबरच जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. बांधकाम विभागातर्फे ग्रामीण रस्ते, जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या विविध इमारती, निवासस्थान, जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या बांधकाम, दुरुस्ती, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या इमारती यासह विविध प्रकारची बांधकामे केली जातात. सन २०१९-२० या वर्षात प्राप्त निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्ष असून, ३१ मार्च २०२१ पूर्वी संपूर्ण निधी खर्च होणे बंधनकारक होते. प्राप्त निधी, खर्च झालेला निधी आणि शिल्लक निधी याचा ताळमेळ एप्रिल महिन्यापर्यंत बसविणे अपेक्षित होते. आता जुलै महिना उजाडत असतानाही २०१९-२० या वर्षातील प्राप्त किती निधी खर्च झाला आणि अखर्चित किती निधी शासनाकडे केव्हा जमा केला, याचा लेखाजोखा बांधकाम विभागाकडे नाही. २८ व २९ जून रोजी बांधकाम विभागात पाहणी केली असता, देयकासाठी अनेकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. वित्त विभागासमोर अनेकांची वर्दळ राहत असून, ही वर्दळ नेमकी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
.....
कोट बॉक्स
माझ्याकडे बांधकाम विभागाचा प्रभार एप्रिल महिन्यात आला आहे. मार्चपूर्वीची मला कल्पना नाही.
-ए.एम. खान
प्रभारी कार्यकारी अभियंता
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वाशिम