वाशिम : ‘वेअर हाऊस’ला जमा केलेल्या १०३ किलो धान्याची नवीन पावती देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाºया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या वाशिम कार्यालयातील कनिष्ठ साठा अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १८ आॅगस्ट रोजी वखार महामंडळाच्या वाशिम कार्यालयातून ताब्यात घेतले. नरेंद्र गोविंदराव सावरकर (३७) असे आरोपीचे नाव आहे.वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील ४० वर्षीय तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ‘वेअर हाऊस’मध्ये (गोदाम) धान्य ठेवले होते. हे धान्य आरोपी साठा अधीक्षकाने १०३ किलो कमी दाखविले होते. ही बाब तक्रारदाराने आरोपीच्या निदर्शनात आणून दिली असता, सुधारित १०३ किलो धान्याची नवीन पावती देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पडताळणी करण्यात आली. १८ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या वाशिम कार्यालयात चार हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. चार हजार रुपये, नवीन पावतीसह पंचासमक्ष आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस. व्ही.शेळके व चमूने पार पाडली.
वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 6:56 PM