लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये २०० गावे आणि २०१६-१७ मध्ये १४९ गावांमध्ये शेकडो कामे प्रस्तावित होती. त्यापैकी २०१६-१७ मधील प्रलंबित १७९ पैकी ९६ पेक्षा अधिक कामे अद्याप अपूर्ण असून, ती पूर्ण करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये मंजूर झालेली ४ हजार ९०६ कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून जिल्ह्यात ३० हजार ५३३ टीसीएम पाणीसाठा उपलबध झाला आहे. तसेच २०१६-१७ मध्ये १४९ गावांमध्ये मंजूर १०५५ कामांपैकी मे २०१७ अखेर १७९ कामे प्रलंबित होती. ती ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाची कामे करणाऱ्या नऊही यंत्रणांना निर्देश देत ही कामे पूर्ण करण्याचा सर्वंकष प्रयत्न केला; मात्र त्याउपरही १०० पेक्षा अधिक कामे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ३० जून ही अंतिम मुदत असल्यामुळे पावसाळा सुरू असतानाही जलयुक्त शिवारची कामे सुरू आहेत; परंतु उणेपुरे सहाच दिवस शिल्लक राहिल्याने ही कामे पूर्ण होणार नाहीत, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
२०१७-१८ मध्ये ९३ गावांचा "जलयुक्त"मध्ये समावेश२०१५-१६ मध्ये २००, २०१६-१७ मध्ये १४९ आणि २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ९३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, २०१६-१७ मधील ह्यपेंडिंगह्ण कामांसह नव्याने मंजूर कामे पूर्ण करण्याचे दुहेरी आवाहन प्रशासनाला पेलावे लागत आहे.