वाशिम : औचित्य होते मुख्याध्यापक संजय वानखडे यांच्या वाढदिवसाचे. परवानगी न घेता शिक्षकाला स्टेजवर बोलावून गाणी म्हणू दिली, ही बाब मुख्याध्यापकाला खकटकल्याने मुख्याध्यापकाने एका महिला शिक्षिकेचा अर्वाच्य भाषेत अपमान करून तिला राजीनामा देण्याचा कांगावा केला. या घटनेमुळे धास्तावलेल्या महिला शिक्षिकेवर एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली. माउंट कारमेल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय वानखडे यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. आपल्या मुख्याध्यापकाचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला. ठरल्याप्रमाणे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करून आपला आनंद द्विगुणित केला. दरम्यान, कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून शाळेमधील शिक्षिका श्वेता पळशीकर यांनी शिक्षक तथा सुप्रसिद्ध गायक मनोज सुतवणे यांना एक गीत सादर करण्याची विनंती केली. नेमका हाच मुद्दा मुख्याध्यापकाच्या जिव्हारी लागला. दुसर्या दिवशी अर्थात २ सप्टेंबर रोजी शिक्षिका श्वेता यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावून अर्वाच्य भाषेत त्यांना अपमानित केले. एवढय़ावरच मुख्याध्यापकांचा राग शांत न झाल्याने त्यांनी शिक्षिकेला राजीनामा देण्याचे फर्मानही सोडले. घडलेला प्रकार महिला शिक्षिकेला सहन न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना लगेचच वाशिम येथील एका खासगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या शिक्षिका पळशीकर यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापकांनी एका महिला शिक्षकास अपमानित केल्यामुळे शाळेतील आठ शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्याध्यापकांच्या विरोधात संप पुकारला आहे. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
माउंट कारमेलच्या मुख्याध्यापक-शिक्षकांत जुंपली
By admin | Published: September 04, 2015 1:28 AM