- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पोलीस पुरस्कार प्राप्त अशोक दौ.गोरे हे मुळ वाशिमचे. पोलीस सेवेत ३७ वर्षे कार्यरत राहून सहायक पोलीस आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले आहेत. सामाजिक कार्यातून गरजवंत, सर्वसामान्यांना दिलासा मिळतो, न्याय दिला जातो, असे ते म्हणतात. वाशिम येथील गोरक्षण परिसरात बांधलेल्या संस्कार केंद्राच्या उद्घाटनासाठी ते वाशिममध्ये आले असता त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - विदर्भ वैभव मंदिर न्यास ही संस्था प्रामुख्याने कोणते काम करते ? उत्तर : शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि आध्यात्मिक स्वरुपाचे सामाजिक कार्य करते. सन १९७१ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. विदर्भाबरोबरच मुंबई परिसरातही सामाजिक उपक्रम राबविले जातात.
प्रश्न - अध्यक्ष म्हणून तुम्ही राबविलेले ठळक उपक्रम कोणते ?उत्तर : आरोग्य विभागात आहाराने रोग निवारण, सुजोक थेरपी, एम.पी.टी. थेरपी, कार्टाेग्राफी होमियोपॅथीची ओपीडी आणि रक्त तपासणारी छोटी प्रयोगशाळा सुरु केली असून ती कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी संगणकाचे प्रशिक्षण, मुला-मुलींसाठी संगीत व गायन व कलेचे प्रशिक्षण, अंधांचे पुनर्वसन, भगवतगीतेचे प्रवचन असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. विदर्भातील आदिवासी विभागात मोफत आरोग्य शिबिरे घेऊन रूग्ण तपासणी केली जाते. विदर्भात दुष्काहग्रस्त भागात पाणीपुरवठाही केला.
प्रश्न - निवृत्त झाल्यानंतर तुम्ही केलेल्या सामाजिक कार्याची माहिती सांगा?उत्तर : एड्स प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात संपूर्ण महाराष्टÑ पोलिसांना कार्यशाळा घेवून प्रशिक्षित केले. मुंबई, ठाणे, रायगड व पालघर,या चारही जिल्हयांमध्ये विविध जातीधर्माच्या २०० च्या वर जोडप्यांचे सामुदायिक विवाह घडवून आणले. कै.दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीचा प्रमुख विश्वस्त म्हणून या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नरत आहे.
प्रश्न - गोरक्षण संस्थेच्या वाटचालीबाबत काय सांगाल ?उत्तर : कै.दिलीप गोरे यांच्या नावाने वाशिम येथे ही संस्था उभी केली आहे. आमच्या मार्इंनी साडेचार एकर जागा कै. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीला दान दिलेली आहे. गोरक्षण हा प्रकल्प पुर्ण झाला असून, कालच संस्कार केंद्र आणि स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. त्यानंतर मतिमंद मुलांची शाळा, वृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र आयुर्वेदीक, निसर्गोपचार, होमियोपॅथी दवाखाना यासह अन्य अनेक आगामी प्रकल्प आहेत. कार्याध्यक्ष प्रा.हरिभाऊ क्षीरसागर आणि सर्व विश्वस्त व दानविरांमुळे संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. गुणवत्तेची पारख करून राष्टÑपती महोदयांनी राष्टÑपती पोलीस पुरस्काराने दोन वेळा सन्मानित केले आहे. मिळालेल्या रकमेतून दारिद्रयरेषेखालील मुली दत्तक घेवून त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या माध्यमातून मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.