वाशिम : जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत अवैध मतदान केल्याचा ठपका ठेवून काँग्रेस पक्षाने ज्योती गणेशपुरे यांचे गटनेते पद काढून घेत नथ्थूजी कापसे यांच्याकडे सोपविले आहे. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गट नेते म्हणून कापसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने ८ जुलै रोजी विषय समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसच्या गटनेत्या ज्योती गणेशपुरे यांनी तीन उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचे मत अवैध ठरले तसेच उर्वरित चार सदस्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते. या सर्व घडामोडींची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आल्यानंतर उपरोक्त सदस्यांकडून पक्षाने खुलासा मागविला आहे. दरम्यान, ज्योती गणेशपुरे यांचे गटनेते पद काढून ते जिल्हा परिषद सदस्य नथ्थूजी कापसे यांच्याकडे सोपविण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी २२ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज दाखल केला होता. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर २५ जुलै रोजी गणेशपुरे यांची गटनेते पदाची निवड रद्द करून नथ्थूजी कापसे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया करणार्या उर्वरित सदस्यांविरूद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाणार असल्याचे वृत्त आहे.
ज्योती गणेशपुरे यांना जिल्हा परिषद गटनेते पदावरून हटविले!
By admin | Published: July 27, 2016 12:52 AM