- धनराज उंटवाल
कामरगाव: कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील शेतकरी सुधाकर प्रल्हाद पुंड यांनी सेंद्रिय पध्दतीने घेतलेले ‘टमाटर’ दुबई येथे पाठविण्यात आले आहेत.कामरगाव येथील शेतकरी सुधाकर प्रल्हाद पुंड यांची विळेगांव शिवारात दोन एकर शेती आहे. या शेतीमध्ये टमाटरचे उत्पन्न घेण्याचा त्यांनी विचार केला व त्यापध्दतीने अभ्यास केला. तेव्हा सिल्लोड जि. औरंगाबाद येथे टमाटरचे उत्पन्न जास्त होत असल्याची माहिती प्राप्त झाली. तेथे जावून तेथून एका कंपनीचे टमाटर बीज आणून आपल्या दोन एकर शेतात आॅक्टोबरमध्ये लागवड केली. त्याची सेंद्रिय पध्दतीने देखभाल करून भरघोस पीक घेण्यास सुरवात केली. त्यात सुधाकर यांनी टमाटर दर्यापुरच्या बाजारात विक्री करण्याकरिता नेले. तेथील व्यापारी यांनी टमाटरची गुणवत्ता , दर्जा व ऊत्तम प्रतीचे असल्याने व ६ ते ७ दिवसानंतरही टमाटरची चकाकी व गुणवत्ता टिकून राहिल्याचे दिसून आले. दर्यापूर येथील व्यापारी यांनी शेतकरी सूधाकर पूंड याच्याशी संपर्क करून चाळीस क्विंटल टमाटर खरेदी करून शेतातूनच पॅकींग करून दुबईला पाठवीले आहेत. तसेच अद्यापर्यत शेतकरी सुधाकर यांनी दोन एकरात ८० हजार रुपये खर्चून अद्यापर्यत एक लाख तीस हजार रूपयांचे टमाटर विक्री केले असून दोन ते तीन लाखाचे उत्पन होईल असे शेतकरी सुधाकर पुंड यांनी सागीतले.