- दादाराव गायकवाड कारंजा: अगदी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून सातत्याने संभ्रम वाढविणाºया कारंजा-मानोरा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांचा तब्बल २२ हजार ७२४ मतांनी पराभव करून या मतदार संघात सलग दुसºयांदा विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे जनतेने विकासाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर कारंजा मतदारसंघात मत विभाजनाचा फटका प्रमुख दावेदारांना बसणार, स्थानिक उमेदवाराला मतदार प्राधान्य देणार, परिवर्तन होणार अशा प्रकारच्या चर्चांना सर्वत्र ऊत आला होता. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीला लढत नेमकी कोणात होणार हे चित्र स्पष्ट नव्हते. तथापि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कारंजा मतदारसंघातील लढत ही भाजपाचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके आणि बहुजन समाज पार्टीचे मो. युसूफ पुंजांनी या तिघातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या निवडणुकीत कारंजा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. भाजपने महायुतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ आपल्याकडेच राखत राजेंद्र पाटणी यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर दुसरीकडे कारंजा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूक असलेले प्रकाश डहाके यांना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यावर गेल्याने मोठा धक्का बसला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी त्यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर गतवेळी भारीप बमसंकडून लढलेले मो. युसुफ पुंजांनी यांनी वंचित बहुजन आघाडीने तिकिट नाकारल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे तिकिट मिळवित निवडणूक लढविली. दरम्यान, हा मतदारसंघ भाजपाला गेल्याने प्रकाश डहाके यांच्या प्रमाणेच शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले डॉ. सुभाष राठोड यांनी मनसेची वाट धरली, तर वंचित बहुजन आघाडीने राजकारणात नवखेच असलेले डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी दिली. यात राजेंद्र पाटणी यांनी गत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आधार घेऊन मतदारांना पुन्हा विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले, दरम्यान, या मतदारसंघासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश डहाके यांच्या पाठीशी असल्याची चर्चा मतदारसंघात पसरली; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाल्याचे दिसले नाही. या निवडणुकीत प्रकाश डहाके यांना ५० हजार ८४१ मते मिळाली, तर तिसºया क्रमांकावर राहिलेले बसपाचे मो. युसूफ पुंजानी यांना ४१ हजार ९०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राम चव्हाण आणि मनसेचे डॉ. सुभाष राठोड यांना मात्र विशेष छाप पाडता आली नाही.
कारंजा निवडणूक निकाल : राजेंद्र पाटणींनी गड कायम राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 5:30 PM