वाशिम: आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी युतीचा निर्णय अद्याप अधांतरी आहे. त्यामुळे भाजप, सेनेच्या इच्छूक उमेदवारांत संभ्रम आहे. भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा-मानोरा मतदारसंघावर शिवसेना दावा करण्याच्या तयारीत आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेणे हेच शिवसेनेसमोर आव्हान आहे.
कारंजा-मानोरा हा मतदार संघ यंदा भाजपासाठी तसा महत्त्वाचाच मानला जात आहे. पूर्वी कधीही या मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला नव्हता; परंतु गतवेळच्या (२०१४) विधानसभा निवडणूपूर्वी शिवसेनासोडून भाजपात प्रवेश केलेल्या राजेंद्र पाटणी यांनी येथे विजय मिळवित ती कसर भरून काढली. आता यंदाच्या निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यात भारीपच्या माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सचिवांनी पदांचा राजीनामा दिला, तर उमेदवारीच्या अपेक्षेने काहींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. भाजपा हा मतदार संघ सोडण्याच्या तयारीत नाही, तर शिवसेनेतीलच अनेक इच्छुकांचाही कारंजा मतदारसंघावर डोळा लागला आहे.
गतवेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. असे असतानाही भाजपची या मतदारसंघात सरशी झाली, तर पूर्वी सेनेचे प्राबल्य असलेल्या याच मतदारसंघात भारीपच्या उमेदवाराने दुसºया क्रमांकाची मते मिळविली. या मतदारसंघातील कारंजा नगर पालिका आणि मानोरा नगरपंचायत ही भारिपच्या ताब्यात आहे. मतदारसंघात भाजपनंतर भारिप बहुजन महासंघाची चांगली ताकद असून आदिवासी आणि बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. मात्र, ग्रामीण भागात सिंचनाच्या सुविधा अत्यल्प आहेत.
गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात सत्तधारी पक्षात असतानाही विद्यमान आमदारांना अपेक्षीत विकास करता आला नाही. अंतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या उभारणीशिवाय इतर क्षेत्रात त्यांना विकास साधता आला नाही. त्यात शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत सुविधांशी निगडीत समस्यांही जैसे थे आहेत. विशेष म्हणजे कारंजातील उपजिल्हा रुग्णालयातील अपु-या सुविधा, रेल्वेमार्गाच्या निर्मितीकडील दुर्लक्ष आदिंचा फायदा घेण्याची तयारी विरोधकांसह युतीच्या घटकपक्षांनीही केली असून रखडलेला विकास आणि शिवसेनेच्या दावेदारीचे मोठे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर राहणार आहे.
आता भाजप-सेनेची युती झाल्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे राहिला, तर सेनेतील इच्छुकांचा हिरमोड होणार आहे आणि सेनेला हा मतदारसंघ सुटल्यास विद्यमान आमदार पाटणींची पंचाईत होणार आहे. त्यामुळे भाजप-सेनेतच या संदर्भात सध्या शितयुद्ध सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गनिमीकाव्याला सुरूंगकारंजा-मानोरा मतदारसंघात २००९ मध्ये विजय मिळविणाºया राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने या मतदारसंघात यंदा गनिमी काव्याने विजय मिळविण्याची तयारी केली होती. त्यासाठी मतदारसंघातील मुस्लिम मतांसाठी डावपेचही आखण्यात आले होते; परंतु मुस्लिम मते खेचणा-या नेत्याचा पक्षप्रवेश रखडलाच आहे दूसरीकडे मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निष्ठावंतांनी गत आठवड्यातच स्वाभिमानाची पायमल्ली होत असल्याचे कारणसमोर करून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गनिमी काव्याला सुरूंगच लागला आहे. माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी सतत दोन वेळा विजय मिळवून काँग्रेसचा दबदबा निर्माण केला असतानाही २००९च्या निवडणुकीत हा मतदारसंघ राकॉला सुटल्यानंतर काँग्रसेने मिळविलेली प्र्रतिष्ठा राष्ट्रवादीला राखता आली नाही. गतवेळच्या निवडणुकीत या मतदारसंघातील काँगे्रसच्या उमेदवाराला आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही. यंदा या मतदारसंघात काँग्रेसकडे दिग्गज उमेदवारांची वाणवा आहे.