गेल्या अडीच वर्षांपासून कारंजा-मानोरा मार्गाचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच या महामार्गाचे अद्ययावतीकरण करणे अपेक्षित होते, परंतु तसा कोणताही प्रकार येथे करण्यात येत नसल्याचे दिसते. या मार्गावर कुपटा, इंझोरी, दापुरासह इतर काही मोठी गावेत आहेत. या गावांच्या मुख्य चौकांत सतत वर्दळ असते. त्यात मार्गावर रस्ता दुभाजक न केल्याने वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे एखादे वेळी मोठा अपघात घडण्याची भीती आहे. ही समस्या लक्षात घेत, इंझोरी ग्रामपंचायतीने शुक्रवारी या मार्गावर इंझोरी दुभाजकाची निर्मिती करण्याची मागणी करणारा ठराव घेतला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
--------------
परावर्तकाचीही आवश्यकता
जिल्ह्यात नव्यानेच झालेल्या सर्वच राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वळणमार्ग दिसावा, इतर दिशा कळाव्यात म्हणून परावर्तक बसविण्यात आले, परंतु इंझोरी मार्गावर काम झालेल्या भागांत अद्याप परावर्तकही लावल्याचे दिसत नाही. या मार्गावर अनेक वळणे आहेत. त्यामुळे रात्री चालकांना अडचणी येऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावर वळणाच्या ठिकाणी परावर्तक बसविणेही आवश्यक असल्याचे मत ग्रामपंचायतीकडून व्यक्त केले जात आहे.