कारंजालाड (वाशिम) : ऐतिहासिक, धार्मिक व शैक्षणिकदृष्ट्या वैभवसंपन्न कारंजा शहराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे जतन करण्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहराभोवतीच्या चारही वेशी शिकस्त झाल्याने कारंजेकरांवर चक्क मृत्यूच्या दारातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. ऐतिहासिक शहराची साक्ष पटवून देणारी दारव्हा वेश उत्तर दिशेला, पोहा वेश पश्चिम, दिल्ली वेश उत्तर तर मंगरूळ वेश दक्षिण दिशेला आहे. शहराच्या संरक्षणार्थ या चार वेशींची निर्मिती करण्यात आली होती. पण या चारही वेशी आजच्या परिस्थितीत अतिशय शिकस्त झाल्या असून, त्याचा मोठा भाग खचला आहे व वेळोवेळी या वेशींचा भाग कोसळतच आहे. या चारही वेशींमधून दररोज शेकडो विद्यार्थी तथा नागरिकांची आवागमन होते. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील चारही वेशी पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येतात. परंतु त्यामधून कारंजेकर ये-जा करतात. त्यादृष्टीने नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेची ठरते. म्हणून नगर पालिकेने नागरिकांनी या वेशीखालून आवागमन करू नये असे सूचना फलक लावले आहे. परंतु या वेशींमधून आवागमन करणे सोयीचे जात असल्याने कारंजेकर जीव मुठित घेवून वेशीखालून प्रवास करतात. मध्यंतरी पुरातत्व विभागाने सर्वेक्षणही केले होते. मात्र, कुठे घोडे अडले कळायला मार्ग नाही. पुरातत्व विभागाने या वेशींना उजाळा द्यावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
शिकस्त वेशीतूनच कारंजेकरांचा प्रवास !
By admin | Published: November 08, 2014 12:47 AM