रिसोड तालुक्यातील भर जहागीर परिसरातील बहुतांश गावांत एक गाव, एक गणपती, संकल्पना राबविण्यात आली आहे, तर काही ठिकाणी विविध गणेश मंडळाने गणेशाची स्थापना केली आहे. अवघ्या दोन दिवसांवर गणेश विसर्जन आला आहे. त्यामुुळे भर जहागीर परिसरात कुऱ्हा, जवळा, चिचांबाभर, मांडवा, मोहजाबंदी, आसोला, लोणी खुर्द, लोणी बु., मोप, बोरखेडी, कन्हेरी, शेलुखडशे, चाकोली, मोरगव्हाण, वाडी, मांगवाडी आदी गावांतील गणेश स्थापना केलेल्या मंडळांना शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष नेमणार, बीट जमादार अनिल कातडे यांनी भेटी देत गणेश विसर्जन शांतात व शिस्तीमध्ये करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जारी नियमांचे पालन प्रत्येक गणेश मंडळाने करण्याचे सक्त आदेश यावेळी गणेश मंडळांना देण्यात आले. यावेळी अनेक गावातील पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्राम सुरक्षा दल समितीचे सदस्यांची उपस्थिती होती.
कोट : कोरोना विषाणू संदर्भात शासनाने लागू केलेल्या नियमावलीचे प्रत्येक गणेश मंडळाने विसर्जनावेळी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. गणेश विसर्जन शांतता, शिस्तीत होणे आवश्यक आहे. त्याप्रकारे सूचना देण्यात आल्या आहेत.
-संतोष नेमणार,
पोलीस उपनिरीक्षक, रिसोड
-------------------
सोयाबीन काढणीची लगबग
भर जहागीर : रिसोड तालुक्यातील भर जहागीर परिसरात यंदा कमी कालावधित येणाऱ्या सोयाबीनची पेरणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. आता हे पीक पूर्णपणे परिपक्व होऊ काढणीवर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाच्या काढणीची लगबग सुरू केली आहे. शेतकरी मळणी यंत्रासह मजुरांच्या शोधात गावागावात फिरत आहेत.