लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ‘जलसाक्षरता दिंडी’चे आयोजन १३ आॅगष्ट २०१९ रोजी दत्तक ग्राम केकतउमरा येथे करण्यात आले होते.आधुनिक काळात अनेक देशात जलसंकट निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात भारतातही मोठया प्रमाणात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जलजाणीव जागृतीच्या अभावी भारतात मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. हा अपव्यय थांबविण्यासाठी घरोघरी जाऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे महत्च सांगण्याचा प्रयत्न या रॅलीमधून करण्यात आला. पाण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जलसाक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यर्थ्यांनी ‘जमीन पाण्याने भरा शिवार समृद्ध करा’, ‘पाणी असेल तर सृष्टी दिसेल’, ‘जल असेल तर जीवन असेल’ अशा उद्बोधक घोषणा दिल्या. प्रदीप पट्टेबहादूर, किरण पट्टेबहाद्दूर, पुनम पट्टेबहादूर, वर्षा पायघन, अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचे महत्व पथनाटयाच्या माध्यमातून विषद केले. परमेश्वर गाभणे, आशिफ भवानिवले, सागर डुबे आदी स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थींनी या दिंडीत सहभागी झाले होते. नेहरू युवा केंद्र वाशिमनेही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
दिंडीच्या माध्यमातून जलजागृती करणारे केकतउमरा गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 2:25 PM