पश्चिम विदर्भामध्ये सरासरी पर्जन्यमान दरवर्षी होते आणि बऱ्याचदा नैसर्गिक व पर्यावरणीय असंतुलनामुळे अतिवृष्टी, छोट्या-मोठ्या नद्यांना पूर,महापुरे येऊन नद्यांद्वारे पाणी वाहून जाते. निसर्गाद्वारे पडणारे पाणी अडवून ते पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी कृषी, जलसंधारण, पर्यावरण, वन आणि इतरही विभागांद्वारा साठवण तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, शेततलावांची निर्मिती करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही हे पाणी अडविण्याची व्यवस्था मोठे प्रकल्प नसल्यामुळे मुख्यत्वे शासकीय जमिनीत आणि आता शेतकऱ्यांच्या शेतातही शेततलाव खोदून जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न शासनाद्वारे करून दुष्काळी भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे, परंतु शासनाच्या लोकोपयोगी धोरणाला हरताळ फासण्याचे काम प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरून करण्यात येण्याचा प्रकार मानोरा तालुक्यातील गादेगाव या गावामध्ये या वर्षी उन्हाळ्यात खोदलेल्या पाझर तलावातील शेततलावाला पाहताक्षणी निदर्शनास येते.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांची महत्त्वपूर्ण भूमिका जिल्ह्यातील कुठल्याही शेत तलावांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देताना असूनही माध्यमांकडून संबंधित शेततलावाबाबत ओरड झाल्यावर, प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेने गाव पातळीवर कर्तव्य बजावणाऱ्या कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षक यांचेवर निलंबनाची कारवाई मात्र, वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांकडून करण्यात आलेली आहे, हे उल्लेखनीय.
.....
चुकीच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या शेततलावासंदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी यांची चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. अहवाल प्राप्त होताच दोषीवर कार्यवाही करू.
शंकर तोटावर, प्र.सहसंचालक कृषी विभाग, अमरावती.