मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील शिरपूरजवळ असलेल्या खंडाळा शिंदे या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. परिणामी, आजारी पडणाºया ग्रामस्थांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. गावात इतर मुलभूत सोयी-सुविधांचाही प्रकर्षाने अभाव असल्याने ग्रामस्थ अक्षरश: हैराण झाले आहेत.गावातील ग्रामस्थांना किमान प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही प्रशासकीय कर्मचारी कर्तव्यात कसूर करतात. त्याकडे अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत असल्याने समस्या उद्भवतात. खंडाळा शिंदे व परिसरातील वाघी बु.,ढोरखेडा, शेलगाव इजारा, बोराळा जहाँगीर आदी गावांमध्ये आरोग्य सुविधांचा पुरता फज्जा उडाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची खोली उपलब्ध आहे; पण त्यात कर्मचारी हजर राहत नसल्याचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून घडत आहे.
स्मशानभुमीअभावी अंत्यविधीचा उभा ठाकला प्रश्न!खंडाळा शिंदे या गावात सुसज्ज स्मशानभुमी अद्याप उभारल्या गेलेली नाही. त्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास, त्याला उघड्यावरच चिताग्नी द्यावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या अधिकच जटील बनते. गावात अनेकविध समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना त्या निकाली काढण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी लक्ष पुरवायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे.