लोकमत न्यूज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भजनी मंडळांसाठी १ लाख १० हजार रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार असून, यात जास्तीत जास्त मंडळीनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मागील ५१ वर्षांपासून चिखली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित खंजेरी भजन स्पर्धा आयोजीत करण्याची परंपरा आहे. यंदा २२ जानेवारीपासून ही स्पर्धा होणार आहे. यात २२ जानेवारी रोजी प्रौढ विभाग, २३ जानेवारीला बाल विभाग व २४ जानेवारी महिला खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. प्रौढ विभागासाठी प्रथम बक्षीस ११,१११ रुपये, व्दितीय ९१११ रुपये, तृतीय ७१११ रुपये, चौथे बक्षीस ४१११ रुपये अशी १४ बक्षिसे देण्यात येणार आहे. बाल विभागात प्रथम बक्षीस ७००१ रुपये, दुसरे ५००१ रुपये, तिसरे बक्षिस ४००१ रुपये, चौथे बक्षिस २५०१ रुपये अशी ८ मंडळांना बक्षिसे दिली जाणार आहे, तर महिला भजनी मंडळांसाठी प्रथम बक्षिस ९००१ रुपये, दुसरे ७००१ रुपये, तिसरे ५००१ रुपये, चौथे ४००१ रुपये, पाचवे ३००१ रुपये अशी १० बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खंजेरी भजन मंडळानी सहभागी व्हावे असे आवाहन खंजेरी भजन स्पर्धा उत्सव समितीचे अध्यक्ष वसंतराव सुर्वे व व्यवस्थापक सुधाकर भांडेकर यांनी केले आहे.
संत झोलेबाबा यात्रा महोत्सवनिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 2:11 PM