तालुका कृषी विभाग, भारतीय हवामान पूर्वानुमान केंद्र भारत सरकार नागपूर तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी केलेल्या आवाहनानुसार ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. तालुक्यातील शेती कसताना शेतकऱ्यांनी पारंपरिक व आधुनिक पद्धतीचा अवलंब पेरणीसाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांत ट्रॅक्टरच्या आधारे शेतकरी पेरणी करीत आहेत, तर काही शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या बैलांचा आधार खरीप पेरणीसाठी घेत असल्याचेही निदर्शनास येत आहे. थोडाही पाऊस झाल्यास शेतात ओलावा वाढल्याने चिखलात ट्रॅक्टरने पेरणी करणे अवघड जाते, तर अशा वेळी बैलांकडून पेरणी सहज शक्य असल्याचे मत चिखली येथील शेतकरी नीलेश राठोड यांनी व्यक्त केले.
----------------------------
घरगुती बियाण्यांवर शेतकऱ्यांचा भर
मागील वर्षी बनावट बियाण्यांचा फटका असंख्य शेतकऱ्यांना बसला. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित शेतमालातूनच बियाणे पेरणीसाठी राखून ठेवले असून, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार या घरगुती बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासून घेतली आहे, तर बियाण्यांची खरेदी करतानाही अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून आणि आपल्याला आवश्यक आहे त्या कंपन्यांचे प्रमाणित बियाणे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.