कारंजा लाड : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ७२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच असून बाजरी पेरणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ७२ हजार ५०० हेक्टर आहे. तालुक्यातील जमीन समतल असून बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ व कापूस ही पिके घेतली जातात. त्याचबरोबर करडई, सूर्यफुल व इतर गळीत धान्याचाही पेरा केला जातो.
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खरीप हंगाम नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात ज्वारी ७५ हेक्टर, बाजरी ५ हेक्टर, मका २५ हेक्टर, इतर पिके अर्थात भाजीपाला १५७० हेक्टर, तूर ८००० हेक्टर, मूग २५०० हेक्टर, उडीद ३००० हेक्टर, तीळ २८ हेक्टर, सोयाबीन ४८००० हेक्टर आणि कपाशी ९२४७ हेक्टर, ऊस २५ हेक्टर क्षेत्र याप्रमाणे पीकपेऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीकपेऱ्यात वाढ झालेली नाही. मागीलवर्षी कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आल्याने यावर्षी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. त्यातच यावर्षी कृषी विभागाकडून घरच्याच बियाणांची उगवण क्षमता तपासून तेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून बहुतांश शेतकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिलेला आहे. यामुळे तालुक्यात बियाणे तुटवडा जाणवला नाही.
कारंजा तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस हा सार्वत्रिक स्वरूपाचा नसून काही भागात तुलनेने कमी पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या पेरण्या होणे अद्याप बाकी आहे. संबंधित त्या-त्या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
..................
प्रतिक्रिया :
कारंजा तालुक्यात यंदा घरच्या सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासून तेच बियाणे पेरण्यावर शेतकऱ्यांकडून विशेष भर दिला जात आहे. यामुळे तालुक्यात यंदा बियाणे तुटवडा जाणवला नाही. ज्या शेतकऱ्यांना बियाणाबाबत अडचण आहे, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- संतोष वाळके
तालुका कृषी अधिकारी, कारंजा