सरकारी कार्यालयात कामे करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडद रंगाचे तथा चित्रविचित्र कपडे परिधान करू नये, खादीला प्रोत्साहन मिळण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक वेळ खादीचे कपडे परिधान करावे. महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शक्यतो पादत्राणे, सॅण्डल आणि शूजचा वापर करावा, तसेच पुरूष कर्मचाऱ्यांनीही शूज किंवा सॅन्डल वापरावी, असे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नसल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.
.......................
जिल्हा परिषद
वाशिम येथील जिल्हा परिषदेतील काही विभागांना भेट दिली असता, कर्मचाऱ्यांना शासनाने दिलेल्या निर्देशासंबंधी पुरेशी माहिती असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. काही कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये दिसून आले; मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी जीन्स पॅन्ट घातलेली असल्याचेही पाहावयास मिळाले.
कोट : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कामे करीत असताना कसे व कोणते कपडे परिधान करावे, यासंबंधीचे आदेश प्राप्त झाले आहेत. तशा सूचना जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. अंमलबजावणी होत नसेल तर पुन्हा सर्वांना सूचना निर्गमित केल्या जातील.
मंगेश मोहिते
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वाशिम.
...........
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात बहुतांश कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये दिसून आले; मात्र जीन्स पॅन्टला बहुतांश कर्मचाऱ्यांनी पसंती दिल्याचे आढळून आले. अनेक पुरुष कर्मचारी शूज घालून होते; तर महिला कर्मचाऱ्यांच्या पायात शूज दिसला नाही; परंतु सॅन्डल अनेकांनी घातलेली होती.
कोट :
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडसंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. याउपरही कुणी अधिकारी किंवा कर्मचारी कुचराई करीत असेल तर नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
षन्मुखराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम.
..............
पंचायत समिती कार्यालय
मानोरा येथील पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी चित्रविचित्र कपडे परिधान केलेला एकही कर्मचारी दिसून आला नाही. काही कर्मचाऱ्यांनी खादीचा शर्ट परिधान केलेला होता; तर काही कर्मचारी जीन्स पॅन्ट, पांढऱ्या शर्टमध्ये आढळून आले.
कोट : ड्रेसकोडची अंमलबजावणी कधीपासून करायची, याबाबतचे आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना प्राप्त होताच, विनाविलंब मानोरा पंचायत समितीमध्ये त्याची अंमलबजावणी करणे सुरू केले जाईल.
- मोहन श्रृंगारे
गटविकास अधिकारी, पं.स., मानोरा.