वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भारिप-बमसं व अन्य संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला. दरम्यान काही आंबेडकरी अनुयायांवर गुन्हे दाखल केले. सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विविध संघटना, आंबेडकरी अनुयायी हे शांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मोठ्या संख्येतील जमाव बघता, काही ठिकाणी जाणून-बुजून अप्रिय घटना घडविल्या गेल्या असा आरोप करीत पोलीस प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, असे राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. भीम अनुयायावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते राजीव दारोकार, राजकुमार पडघान, अजय ढवळे, दौलतराव हिवराळे, प्रवीण पट्टेबाहदूर, सुनील कांबळे, प्रमोद खडसे, डी.एन. गायकवाड, बाळाजी गंगावणे, निलेश भोजने यांच्या सह शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.