कोठारी परिसरात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाेरदार पाऊस जास्त झाल्याने. काही शेतकऱ्यांनी घाई करून खरीप पेरणी उरकली. त्यात काही शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले, तर काहींचे अद्याप उगवलेच नाही. आता पावसाने दडी मारल्याने पूर्वीच्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकरी मात्र कोरड्या जमिनीतच पेरणी करीत असल्याचेही दिसत आहे. आता येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, तर पेरण्या उलटण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे नुकसान टाळणे आवश्यक आहे.
---------------------
कोरड्या जमिनीवरच पेरणीचा आटापिटा
कोठारी परिसरात पावसाने सहा दिवसांपासून दडी मारल्याने आधीच पेरण्या संकटात सापडल्या आहेत. त्यात अनेकांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. अशात पेरणीचा काळ निघून जाऊ नये आणि उत्पादनात घट येऊ नये म्हणून काही शेतकरी कोरड्या जमिनीतच पेरणी करीत आहेत. येत्या एक दाेन दिवसांत पाऊस पडल्यास या पेरणीला आधार देईल, असा विश्वास या शेतकऱ्यांना आहे.