वाशिम : यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने सोयाबीनच्या एकरी उत्पादनात कमालिची घट येत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. पावसाने दीर्घ खंड दिल्याने उत्पन्नात ५० टक्के घट येण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने वर्तविला होता, हे विशेष.
यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने पेरण्यादेखील विलंबाने झाल्या. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग विश्रांती घेतल्याने याचा जबर फटका सोयाबीनला बसला. ऑगस्ट महिन्यात चार आठवडयात पाऊस कमी झाला. त्यामुळे सोयाबीनच्या कळया व फुले गळून पडल्याने यावर्षी ५० टक्यांपेक्षा कमी उत्पन्न होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. अनेक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी सोयाबीनची शेती फुलवली. मात्र सोयाबीनवर मोझ्याक, तांबेऱ्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे. सोयाबीन सोंगणी, काढणीत शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येते. हलक्या प्रतीच्या जमिनीत तर एकरी दोन ते चार क्विंटल उतार येत आहे तर चांगल्या प्रतीच्या जमिनीत एकरी चार ते सात क्विंटलदरम्यान उतार येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावसाचा खंड, पिवळा मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. त्यातच बाजारभावही कोसळल्याने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? हा महत्वाचा प्रश्न आहे.- हरीश चौधरी, शेतकरी पार्डी टकमोर