लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात १ लाख ७९ हजार २०६ जॉबकार्डधारक मजूरांची नोंद आहे. मात्र, दिवसभर राबराब राबूनही केवळ २०१ रुपये मजुरी हातात पडत असल्याने ‘रोहयो’च्या कामांकडे मजूरांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, जिल्ह्यात विविध स्वरूपातील १० हजार २०० कामे अपूर्ण स्थितीत अडकली असून नवीन कामांचीही मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबूतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे, रोपवाटिका तयार करणे, शेततळे यासह इतर स्वरूपातील कामे जॉबकार्डधारक मजूरांकडून करून घेतली जातात. असे असले तरी दिवसभर राबूनही केवळ २०१ रुपये मजूरी मिळत असल्याने बहुतांश मजूरांनी ‘रोहयो’च्या कामांना नापसंती दर्शविली आहे. याशिवाय मस्टर भरण्यासह इतर जाचक अटींमुळे ‘वरकमाई’ होत नसल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा देखील ‘रोहयो’च्या कामांना विशेष प्राधान्य देत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कागदोपत्री जॉबकार्डधारक १ लाख ७९ हजार २०६ मजूरांची नोंद दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ३७ हजार ८५१ मजूरच कार्यरत आहेत. मजुर मिळत नसल्याने जुन्यापैकी तब्बल १० हजार २०० कामे अपूर्ण आहेत; तर नव्याने कामांची मागणी देखील नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बहुतांशी वांध्यात सापडल्याचे दिसून येत आहे.
तालुकास्तरावरील अधिकाºयांना त्यांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात येणाºया विविध कामांची मागणी करण्यास सांगितले आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मजूरांकडूनही ‘रोहयो’च्या कामांना नापसंती दर्शविली जात असल्यानेच जुनी कामे तशीच प्रलंबित राहत आहेत.- सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम