वाशिम येथे दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी एका स्वतंत्र कक्षात ही सुविधा होती. तथापि, तेथे इतर कामकाज सुरू असल्याने आता एड्स नियंत्रण कक्षासाठी असलेल्या इमारतीमधील एका खोलीत दिव्यांगांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी दिव्यांगांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांना बाहेरच ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र दर बुधवारी पाहायला मिळते. यातून कोरोना विषाणू संसर्ग पसरण्याची भीती आहे.
बॉक्स : दिव्यांग प्रमाणपत्र कशासाठी
१) दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ, उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची सवलत, आवश्यकतेनुसार लेखनिक देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय-अंशत: अंध, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना आकृत्या किंवा नकाशावर आधारित प्रश्न सोडवण्यास सवलत, श्रवणदोष, वाचादोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे यांसंबंधीच्या चुका ग्राह्य धरण्यासह इतर सवलतींसाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे.
२) परीक्षा केंद्रावर अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी विशेष सुविधाही केली जाते, तसेच ये-जा करण्यास मदतीची सुविधाही असते.
२) दिव्यांगांना एसटी बसमध्ये तिकिटात ७५ टक्के सवलत, तसेच समाज कल्याणच्या विविध योजनांच्या लाभासह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिवाय शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजनेचा लाभही मिळतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडील ऑनलाइन प्रमाणपत्र त्यांना मिळवावे लागते.
-----
बॉक्स: दररोज ५० प्रमाणपत्रांचे वितरण
जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या प्रस्तावानुसार विद्यार्थी आणि इतर दिव्यांग व्यक्तींची संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. यात अस्थिव्यंग, श्रवणदोष, दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींचा समावेश असून, पूर्ण तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडल्यानंतर दरदिवशी ५० दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जाते.
------------
बॉक्स : प्रमाणपत्रासाठी आमची ओढाताण
कोट: माझ्या एका पायात अपंगत्व आहे. त्यामुळे रीतसर दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी कागदपत्रे सादर करून तपासणी करून घेतली; परंतु मला अद्यापही प्रमाणपत्र मिळाले नाही. दर बुधवारी मी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी चकरा मारत आहे.
- शेख रहिम,
दिव्यांग, मंगरुळपीर
-------------
कोट: शासकीय योजनेतून शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी मी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. माझी तपासणीही झाली; परंतु दोन महिने उलटले तरी मला दिव्यांग प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे वारंवार वाशिमला यावे लागत आहे.
-राहुल भगत
विद्यार्थी, मानोरा
-------
कोट: जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगाच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्षाचे काम सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत उपलब्ध जागेतच दिव्यांगांची तपासणी करावी लागत आहे. दिव्यांग आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम