लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यभरात हाहा:कार माजला आहे. या पृष्ठभुमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना कारंजा येथील कोरोना रुग्णालयात मात्र कोरोनाच्या रुग्णांसाठी सडक्या गाद्या वापरात आणल्या आहेत. आरोग्य विभागाच्या या कारभाराप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना संदिग्ध व बाधित रुग्णांसाठी ५० बेडची व्यवस्था केली. येथे नवीन गाद्या आणि बेडशीट, ब्लँकेट मिळणे गरजेचे होते. असे असताना जिल्हास्तरावरून आरोग्य विभागाने ३० निकृष्ट दर्जाच्या गाद्या पाठविल्या. पलंग तर एकही मिळाला नाही. ठिकठिकाणी फाटलेल्या आणि मळलेल्या गाद्यांवर रुग्णांना झोपवून इलाज करणार का, असा संतप्त सवाल आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
डॉक्टरांचे ‘अपडाऊन’!कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहणे बंधनकारक करण्यात आले; मात्र कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. मधुकर मडावी हे ‘रेड झोन’ असलेल्या नजिकच्या यवतमाळ जिल्ह्यातून; तर डॉ. जयंत पाटील हे अकोला येथून ‘अपडाऊन’ करतात.
वाशिमनंतर कारंजा येथे कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित झाले. कोरोनासंदर्भात सद्य:स्थिती अत्यंत गंभीर असताना त्याठिकाणी कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. किमान ५० नवीन गाद्या, बेडशीट आणि ५० सुस्थितीमधील पलंग असायला हवे होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. आरोग्य सुविधेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक हे गंभीर नसल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवा कोलमडत आहे.
- राजेंद्र पाटणीआमदार, कारंजा
नवीन गाद्या, पलंगांकरिता पुरेसा निधी नसल्यामुळे जुन्या गाद्यांचा वापर करावा लागत आहे. शासनाकडून यासाठी निधी प्राप्त झाल्यास नवीन साहित्य पुरविण्यात येईल. रुग्णांना पुरविण्यात येणाºया सेवा-सुविधांबाबत आरोग्य विभाग दक्ष आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम