राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ९७ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून, या मार्गाला ४६१-बी हा क्रमांकही देण्यात आला. या महामार्गाच्या कामासाठी मालेगाव-हिंगोली या ९७ किलोमीटर अंतरात पूर्वीचे पूल पाडून नवीन पूल बनविण्यात आले. सद्यस्थितीत रिसोड तालुक्यातील मसला पेन येथील नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. मार्गादरम्यान येणा-या गावांत महामार्गाच्या कडेला पेव्हर ब्लॉकही बसविण्यात आले. काही ठिकाणी प्रवासी निवारेही उभारण्यात आले; परंतु या मार्गाच्या कामांत प्रस्तावित असलेल्या नाल्यांच्या कामाला शिरपूर येथे अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे आता कामात समाविष्ट असलेले नाल्यांचे काम होणार किंवा नाही, अशी शंका शिरपूर येथील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात असून, नाल्यांचे काम न झाल्यास भविष्यात गावक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
----------
कोट: मालेगाव-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गादरम्यान प्रस्तावित असलेले नाल्याचे बांधकाम अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे हे काम होणार का नाही अशी शंका उपस्थित होत असून, नाल्याअभावी पुढील काळात उद्भवणा-या अडचणींचा विचार करून महामार्गालगत नाल्यांचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे.
- अमोल महाजन,
ग्रामस्थ, शिरपूर जैन.
-------------
कोट: मालेगाव-हिंगोली या महामार्गाच्या कामांत नाली बांधकामाचे प्रयोजन होते; परंतु शिरपूर येथे महामार्गालगत नाल्यांच्या बांधकामासाठी पुरेशी जागा नसल्याने नाली बांधकाम होणार नाही.
-ए. एस. चौधरी.
उपअभियंता
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अकोला.