मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ९७ किलोमीटर रस्त्याचे जवळपास पाचशे कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना शिरपूर ते रिसोड दरम्यान रस्ता कामात अडचणीचे ठरणारे प्रवासी निवारे जमीनदोस्त करण्यात आले. मात्र, अद्यापही बऱ्याच ठिकाणी हे प्रवासी निवारे पुन्हा बांधण्यात आले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने किन्ही घोडमोड फाटा, दुधाळा, मसलापेन, लिंगा, वाडी रायताळ, खडकी बसथांबा परिसरात प्रवासी निवारे पुन्हा बांधण्यात आले नाहीत. परिणामतः प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस सहन करावा लागतो, तर केशवनगर, देगाव, पळसखेडा येथील पूर्वीचे प्रवासी निवारे नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्त करण्याची गरज आहे. रस्ता विकासकाम करताना शिरपूर येथील रिसोड फाटा परिसर, दापुरी, किनखेडा, बिबखेडा येथे अतिशय छोट्या स्वरूपाचे प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत.
दुधाळा येथील बसथांबा परिसरातील प्रवासी निवारा रस्ता कामांमध्ये पाडण्यात आला. मात्र अद्यापही दुसरा प्रवासी निवारा उभारण्यात आला नसल्याने प्रवासी वाहनाची वाट पाहताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. - शिवाजी काळे, ग्रामस्थ दुधाळा.