००
शिरपूर येथे आणखी सात कोरोनाबाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील आणखी सातजणांचा कोरोना चाचणी अहवाल २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढत आहे.
००
विहीर अधिग्रहण करण्याची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहीर अधिग्रहण करण्यात यावे तसेच टँकरने पाणीपुरवठा करावा, विशेष नळ दुरुस्ती योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
०००
वनोजा येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील नऊजणांचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
००
देयके अदा करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील ६७ हजारांवर ग्राहकांकडे ४४ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन महावितरणने केले.
००
हातपंप बंद; ग्रामस्थांची गैरसोय
वाशिम : चिखली परिसरातील काही बसथांब्याजवळील हातपंप गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. हातपंपाची गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने दुरुस्ती केली होती; मात्र काही दिवसांतच पुन्हा बिघाड झाला.
००
‘त्या’ इमारतीची दुरुस्ती प्रलंबित
वाशिम : येथील आरटीओ कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले असून, जुन्या इमारतीची पडझड झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी असताना दुर्लक्ष केले जात आहे. यासंबंधी मिलिंद सरकटे यांनी बुधवारी प्रशासनास निवेदन दिले.
००
लाभार्थींना घरकुल अनुदान वितरण
वाशिम : उपलब्ध निधीनुसार जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींना अनुदान वितरण केले जात असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंगळवारी स्पष्ट केले.
००
तोंडगाव येथे आरोग्य मार्गदर्शन
वाशिम : वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे एकजणाचा कोरोना चाचणी अहवाल २० एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने गावात दाखल होत संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.
००
स्मशानभूमी शेडचा अभाव
वाशिम : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथे अंत्यविधी उरकण्यासाठी स्मशानभूमी शेडच नाही. त्यामुळे मृत व्यक्तीवर उघड्या जागेतच अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत. याची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी केली.
00
बालविवाहासंबंधी माहिती देण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने बुधवारी केले.
00
भूखंडाची खरेदी प्रक्रिया ठप्प
वाशिम : राज्याच्या इतर जिल्ह्यांत भूखंडाची शासकीय खरेदी-विक्री सुरू असताना वाशिम जिल्ह्यात बंद आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून, ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी भीमसंग्राम सामाजिक संघटनेने केली.
०००००
आययुडीपी कॉलनीत पथदिवा बंद
वाशिम : नवीन आययुडीपी कॉलनीतील काही पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य असते. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी बुधवारी केली.