लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा (वाशिम) - विद्यार्थी संख्या जास्त असतानाही केवळ एका शिक्षकावर किनखेडा ता. रिसोड येथील जिल्हा परिषद शाळेची जबाबदारी सोपविली आहे. आणखी एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला.मागील वर्षभरापासून तीन शिक्षकी असलेली किनखेडा जि.प. शाळा दोन शिक्षकांवर आली. त्यातील एक शिक्षिका दिर्घ आजारी रजेवर असल्यामुळे एकाच शिक्षकाला ४ वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक करावी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पंचायत समिती, शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप शिक्षक मिळाला नाही. दोन महिन्यापुर्वी असाच आंदोलनात्मक पवित्रा घेतला असता केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांनी १५ दिवसात शिक्षक देतो, असे आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाचे आदेशही काढण्यात आले. परंतु सदर आदेश हे संबंधित शिक्षकापर्यंत पोहचले आणि तीन दिवसात जलदगतीने चक्रे फिरल्याने शेवटी तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकाचे बदली आदेशही मागे घेण्यात आले. याप्रकरणी शिक्षण विभागावर नेमका कुणाचा दबाव आला? याची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. किनखेडा येथील शाळेवर तात्पुरत्या स्वरुपात एक शिक्षक देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाई धोरणाचा निषेध म्हणून शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला. पालकांचा हा निर्णय शिक्षण विभाग किती गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर रिसोडचे गटशिक्षणाधिकारी खराटे यांच्या घरी लग्नसमारंभ असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. सहा महिन्यांपासून शिक्षक मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहोत. परंतू, शिक्षण विभाग जाणूनबुजून राजकारण करीत आहे. त्यामुळे संघर्ष केल्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेत मुले न शिकवलेली बरे. - ज्ञानेश्वर उत्तमराव अवचार अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती किनखेडा ता. रिसोड
शिक्षकांचा अभाव; विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 5:57 PM