संतोष वानखडे वाशिम, दि. १९- स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरातील तफावतीची दरी कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून २४ जानेवारी रोजी शाळा, अंगणवाडी व सरकारी दवाखान्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. वाशिम, बुलडाणासह राज्यातील १६ जिल्हय़ात हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिली.स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले. सध्या ह्यकन्यारत्नह्ण जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि मिठाई देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. वाशिम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमातून अभिनंदनपर शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आले. जिल्ह्यात कुठेही कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय व जि.प. महिला व बालकल्याण विभागाच्या चमूतर्फे संबंधित गावात जाऊन माता-पित्यांचे अभिनंदन करून मिठाई दिली जात आहे. या अभिनंदनपर कार्डवर ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्णसंदर्भात विविध घोषवाक्य असून, शासनाच्या ह्यमाझी कन्या भाग्यश्रीह्ण या योजनेची माहिती संकलित केली आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये ह्यगुड्डा-गुड्डीह्ण बोर्डद्वारे मुला-मुलींचे जन्माचे लिंगगुणोत्तर प्रमाण अद्ययावत ठेवले जात आहे. मुला-मुलींच्या जन्माची माहिती अद्ययावत मिळणार असल्याने मुलींचा जन्मदर कमी असलेल्या भागात जनजागृतीवर अधिक भर दिला आहे. आता केंद्रीय महिला व बालविकास यंत्रणेने तसेच राज्याच्या महिला व बालविकास विभागाने २४ जानेवारी रोजी बालिका दिनाचे औचित्य साधून लेक वाचवा, लेक शिकवा चा जागर करण्याच्या सूचना वाशिम, बुलडाणा यांसह १६ जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात प्राथमिक ते महाविद्यालयीन शाळा, अंगणवाडी केंद्र व सरकारी दवाखान्यांमध्ये विविध उपक्रम राबवून लेक वाचवाचा संदेश दिला जाणार आहे . वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, दवाखाने, अंगणवाडी येथे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या.
राज्यातील १६ जिल्हय़ात ‘लेक वाचवा’चा गजर!
By admin | Published: January 20, 2017 2:05 AM