लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या नोंदी घेत असताना महसूल विभागाने प्रचंड चुका करून ठेवल्या आहेत. त्यास पुष्टी देणारा एक प्रकार ब्राम्हणवाडा (ता.मालेगाव) येथे उघडकीस आला असून अल्पभूधारक शेतकरी साहेबराव प्रल्हाद आघाव यांची रस्त्याच्या कडेला असलेली अडीच एकर जमीन अकोला-हैदराबाद चौपदरी महामार्गात जात असताना दुस-याच्याच शेताची त्याठिकाणी नोंद असल्याने आघाव यांच्यावर भुसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली आहे.अकोला-हैदराबाद राष्ट्रीय चौपदरी महामार्ग निर्मितीच्या हालचालींना सद्या वेग आला असून, भुसंपादनाच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील जमिनीच्या मोजणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. दरम्यान, ब्राम्हणवाडा येथील शेतकरी साहेबराव आघाव यांचे गट नंबर १३० मधील अडीच एकर शेत या महामार्गात जात आहे. असे असताना गट नंबर १३३ मधील दत्तराव कुंडलिक नागरे यांच्या शेताची नोंद त्याठिकाणी दर्शविण्यात आलेली आहे. जेव्हा की नागरे यांचे शेत महामार्गापासून बरेच लांब आहे. तथापि, महसूल विभागाकडून झालेली ही चूक दुरूस्त करून मिळणेबाबत आघाव यांनी जिल्हाधिकारी, वाशिम उपविभागीय अधिकारी, मालेगाव तहसीलदार आदिंकडे वेळोवेळी तक्रार दाखल केली. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जवळ असलेली सर्वच जमीन महामार्गात जाऊनही मोबदला मिळणार नसेल तर आपल्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असे शेतकरी आघाव यांनी सांगितले.
ब्राम्हणवाडा येथील शेतकरी साहेबराव आघाव यांच्यावर निश्चितपणे अन्याय होणार नाही. यासंदर्भात सखोल चौकशी करून महसूल विभागाकडून जमिन नोंदणीत चूक झाली असल्यास ती विनाविलंब दुरूस्त करून दिल्या जाईल. - राजेश वजीरे, तहसीलदार, मालेगाव