मेडशी(जि.वाशिम), दि. २0- येथून जवळच असलेल्या नागनाथ महादेव संस्थान येथे १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान चोरी करण्याच्या अयशस्वी प्रयत्न झाला. या घटनेतील चोरट्यांना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ मंगळवारी सकाळी मेडशी पोलीस चौकीवर धडकले. यानंतर जलदगतीने तपासाची चक्रे फिरली आणि पातूर येथून एका संशयिताला पकडून आणले. येथील नागनाथ संस्थानचे अध्यक्ष उल्हासराव साहेबराव घुगे (४१) यांनी पोलिसात फिर्याद दिली की, १९ सप्टेंबरच्या रात्री दरम्यान नागनाथ महादेव संस्थान येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने संस्थानमध्ये प्रवेश केला. पुजारी रामदास महाराज यांनी प्रसंगावधान ओळखून येथील नागरिक अभिजित मेडशीकर, धिरज विश्वकर्मा यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली की, आरोपी महादेव पिंडीच्या वरचे धातुचा घंटा, समई, नाग चोरी करीत असल्याचे सांगितले. अभिजित मेडशीकर, धिरज विश्वकर्मा घटनास्थळी दाखल झाले असता चोरट्यांनी दगडफेक करुन अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनेची माहिती मंगळवारी सकाळी गावात वार्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी चोरट्यांना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी मेडशी पोलिस चौकीत एकच गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालेगाव, शिरपूर, जउळका, वाशिम येथील पोलिस ताफा दाखल झाला. गावाला छावणीचे रुप आले. तोपर्यंंत माजी जि.प. अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद तायडे, ग्रामपंचायत सदस्य शेख जमीर शेख गणीभाई, जि.प. सदस्य श्याम बढे, तालुका दक्षता समिती सदस्य रणजित मेडशीकर, प्रसाद पाठक, अजय चोथमल, ज्ञानेश्वर मुंढे यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी पोलिस चक्रे व तहसिलदार जयवंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय अधिकारी पोलिस चक्रे यांनी एका जणाला पातूर येथून जेरबंद केले. जेरबंद केलेल्या संशयिताचे नाव शे. रहेमान उर्फ भुर्या शे. हसन असे आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवी कलम ३७९, ५११, ३३६, २९५, ३४३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुकेशनी जमदाळे, जमादार सुरेंद्र तिखिले, शिपाई संतोष अवगडे, विलास गायकवाड करीत आहे.
चोरट्याला अटक करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
By admin | Published: September 21, 2016 2:19 AM