वसई : वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सोमवारी ( दि.३१ ) सकाळी ८ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावाजवळ ( वाघोबा खिंडीत) मोठी गळती झाली असून अचानकपणे सुरू झालेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया ही गेलं आहे. दरम्यान या गळतीमुळे आता सुर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्यानं शहरात सोमवारी पाणी बाणी राहणार आहे
परिणामी वसई विरार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास या गळती ची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तिच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू केल्याची माहिती पाणीपुरवठा नियंत्रक यांनी लोकमत ला दिली आहे. विशेष म्हणजे या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिका पाणीपुरवठा दुरुस्ती पथकास साधारण ८ ते १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे ही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. किंबहुना वसई विरार शहराला करण्यात येणारा सूर्या योजनेच्या जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा सोमवार सकाळ पासूनच पूर्ण पणे बंद झाला आहे. तर नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा मात्र सुरळीत चालू असला तरी जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शहरात सोमवारी दिवसभर अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून पाणी देखील जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने शहरातील नागरिकांना केलं आहे.