जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७४ हजार ७३५ असून, जिल्ह्यात १० लाख १३ हजार १८० लसीकरणाचे उद्दिष्ट होते. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लसीकरणात प्रथम पसंती देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले, तर आता १८ वर्षे व त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. या मोहिमेत लसींचा तुटवडा ही अडचण असताना नागरिकांचाही प्रतिसाद सुरुवातीला मिळाला नाही. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्रस्त केले. आता ही लाट पूर्णपणे ओसरली नसताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला असून, यासाठीच आरोग्य विभागाने लसीकरणाला गती दिली आहे. तथापि, निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ४० टक्के लसीकरण होऊ शकले आहे. त्यात शहरी भागांतील लसीकरण ७८ टक्के झाले आहे, तर ग्रामीण भागांतील केवळ ३३ टक्के झाले आहे.
----------------------
१५६ केंद्रांवर नियमित लसीकरण
जिल्ह्यात लसीकरणाचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. यासाठी जिल्हाभरात शहरी आणि ग्रामीण भागांत मिळून १५६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवर आरोग्य विभागाकडून नियमित लसीकरण केले जात आहे. आता पूर्वीप्रमाणे लसीकरणासाठी नोंदणी करण्याची अटही नसल्याने लसीकरणाला प्रतिसाद वाढत आहे.
------------
रिसोड शहरात लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक
कोरोना लसीकरण प्रक्रियेला ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांत मोठा प्रतिसाद लाभत असला तरी, शहरी भागांतील लसीकरणात रिसोड शहराने आघाडी घेतली आहे. रिसोड शहरात समता फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याने १७ जुलैपर्यंत एकूण ३८३१६ शहरी लोकसंख्येपैकी ३४६३७ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला, तर ५१६७ नागरिकांनी दुसराही डोस घेतला आहे.
----------------------
लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट - १०,१३,१८१
झालेले एकूण लसीकरण -४,३१,३०६
पहिला डोस - ३,२९,२४९
दुसरा डोस -१,०२०५७
------------------
ग्रामीण भागाचे उद्दिष्ट - ८,१५,४५५
एकूण ग्रामीण लसीकरण - २,७६, १५०
---------------------
शहरी भागाचे उद्दिष्ट - १,९७,७२६
एकूण शहरी लसीकरण - १,५५, १५६
------------------------
ग्रामीण भाग पहिला डोस - २,१२,६४०
शहरी भाग पहिला डोस- १,१६,६०९
--------
ग्रामीण भाग दुसरा डोस - ६३,५१०
शहरी भाग दुसरा डोस- ३८,५४७