वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असून, मास्कचा वापर न करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे तर दुसरीकडे स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी होत असल्याचे वृत्त लाेकमतने २४ जानेवारी राेजी प्रकाशित केले हाेते. या मेळाव्यातील एक दुकानदार काेराेनाबाधित आढळून आला. अखेर आनंद मेळावा गुंडाळण्याची वेळ आयाेजकांवर आली.
रस्त्यावर कोरोनाविषयक नियमाची अंमलबजावणी होत असताना, ‘आनंद मेला’त नागरिकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेऊन काेराेनाला आमंत्रण दिल्या जात असल्याचे चित्र हाेते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात शासन, प्रशासनातर्फे जनजागृती केली जात असताना येथे या नियमांना तिलांजली दिल्या गेल्यासंदर्भात सविस्तर वृत्तांकन लाेकमतच्यावतीने करण्यात आले हाेते. या वृत्तानंतर या आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या दुकानदारांपैकी एक दुकानदार काेराेनाबाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली हाेती. पर्यायी आयाेजकांना आपला आनंद मेळावा गुंडाळावा लागला.