लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यापीठाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या दिवशी १७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची एकच गर्दी उसळली होती.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच अन्य विद्यापीठांच्या कला, वाणिज्य, विज्ञान तसेच समाजकार्य शाखेतील बी.एस.डब्ल्यू, एम.एस. डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली. सुरुवातीच्या दिवसात महाविद्यालय परिसरात परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी गर्दी झाली नाही. गत तीन दिवसांपासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यासह अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपापले महाविद्यालय गाठल्याने तेथे एकच गर्दी होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जवळपास २६ महाविद्यालये असून, २० हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केल्याने अनेक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन झाले नसल्याचे बुधवारी दिसून आले.
विद्यापीठ परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी उसळली विद्यार्थ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:38 PM