लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जिंतूर ते अकोला ही बसफेरी शिरपूर बसस्थानकापर्यंत न येता परस्पर वळणमार्गावरून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे अकोला विभागीय नियंत्रकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपा शहर प्रमुख प्रदीप देशमुख यांनी ८ मे रोजी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन ही बसफेरी ९ मे पासून पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येणे सुरू झाले आहे. गत २५ वर्षांपासून जिंतूर आगाराची जिंतूर ते अकोला ही बसफेरी शिरपूर मार्गे सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून सदर बसफेरी शिरपूर बस स्थानकावर न आणता गावाबाहेरुन नेण्यात येत आहे. त्यामुळे या बसफेरीने शिरपूर येथून अकोला किंवा इतर ठिकाणी जाणाºया प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होतो. इतर सर्व आगाराच्या बस नियमितपणे शिरपूर बस स्थानकावर प्रवाशांची ने-आण करीत आहेत. मात्र जिंतूर आगाराची बसफेरी ही आठ महिन्यापासून बसस्थानकापर्यंत आणण्यात येत नव्हती, असाच प्रकार ८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता घडला. ८ मे रोजी सदर बसस्थानकापर्यंत न आणता, रिसोड फाट्यावर उभी करण्यात आल्याने लहान मुले आणि प्रवाशांची गैरसोय झाली. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रदीप देशमुख यांनी ८ मे रोजीच केली होती. त्या मागणीची दखल घेऊन जिंतूर आगाराच्या बसचालकांना ठरलेल्या मार्गानुसार बस नेऊन नियोजित थांब्यावर बस थांबविण्याच्या सुचना करण्यात आल्या. त्यामुळे ९ मे पासून ही बसफेरी पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला.
...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 3:44 PM