मानोरा : लग्नसराई शेवटच्या टप्प्यात असून उन्हाळा संपत आल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप हंगामाच्या तयारीची शेती कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत.शेती पावसाळ्याअगोदर पेरणीकरिता तयार व्हावी म्हणून तालुक्यात नांगरणी, कचरा वेचणे, बी-बियाणे, अवजारे यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.तालुक्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकर्यांना निसर्गाच्या भरवशावर राहूनच आपली शेती करावी लागते. उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी व तूर ही तालुक्यातील शेतकर्यांची प्रमुख पीके असून या दृष्टीने बहुतांश शेतकर्याकरिता खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा आहे. खरीपातील पिकांच्या भरवशावर अनेक शेतकर्यांचे वर्षाचे आर्थिक व्यवहाराचे गणित अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा या दृष्टीने कामाला लागला आहे.पूर्वी असलेली पारंपरिक शेती करण्याची पद्धत बंद झाली असून नांगरणी व इतर कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्राने करण्याकडे शेतकरी वळला आहे. बैलांची कमतरता व घाम गाळून काम करण्याची पहिल्यासारखी शेतमजुरांची मनस्थिती न राहिल्याने यंत्रणाच्या सहाय्याने सर्व कामे उरकून घेण्यात शेतकरी मग्न आहे. आजमितीला सालदार व्यवस्था संपुष्टात आली असून रोजंदारीनेही कोणी कामाला यायला तयार नसल्यामुळे जास्तीत जास्त करुन यंत्रांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
मानोरा तालुक्यात खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात
By admin | Published: June 21, 2014 12:20 AM