लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला आज, २ जुलै रोजी वाशिम शहरातून थाटात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आयपीएस अधिकारी तथा वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाच्या कार्य बहुतांशी थांबले होते. यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी डाॅ. नारायण डाळे, सामाजिक कार्यकर्ते किरण साेमाणी, दिगंबर निरगुडे, डाॅ. सुजाता जाजू, डाॅ. अनुराधा दागडिया, अर्चना नारायण डाळे आदिंची उपस्थिती हाेती.त्यानुसार, २ जुलै रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडी मंगल कार्यालयासमाेर असलेल्या कांतादेवी डाळे रक्तपेढीच्या नियाेजित ईमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. १४ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे याप्रसंगी मान्यवरांनी केले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही हजेरीवाशिमच्या डाळे रक्तपेढीत आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यादरम्यान वाशिम पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली. याप्रसंगी लोकमतच्या वाशिम कार्यालयात कार्यरत विजय वानखेडे यांनीही रक्तदान केले.