लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ १२ नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, चंद्रकांत घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मीना म्हणाले की, क्षयरोगाविरूद्धच्या लढ्यात सर्वांनी साथ देण्याची गरज आहे.क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घटकाच्या सहकार्याची गरज आहे. या मोहिमेत लोकसहभाग कसा वाढेल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. क्षयरुग्णांनी पुरेशा कालावधीकरीता नियमित औषधोपचार घ्यावा, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सेविकांनी गावपातळीवर प्रभावीपणे मोहिम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेच्या माध्यमातून सर्व रुग्ण निदानापासून व उपचारापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असे निर्देशही दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांनी केले. प्रास्तावित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी तर आभार जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ. जिरोणकर यांनी मानले.
गृहभेटीतून जनजागृती१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ही मोहिम राबविली जाणार असून, ३०९ पथकाद्वारे जिल्ह्यातील ३५ हजार ४९ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. यावेळी क्षयरोगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.