लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व सत्ता स्थापनेसाठी एकजूट दाखविणारे शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस हे तीनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकलेले नाहीत. पॅनेल, आघाडीच्या नावाखाली स्थानिक पातळीवर निवडणूक लढवली जात असून, यामध्ये कुणाची सरशी होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बहुतांश निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातही जानेवारी २०२०मध्ये महाविकास आघाडीच्या नावाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यात आल्या होता. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस व शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन भाजप व जिल्हा जनविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काही गट, गणांचा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा एकत्रितपणे सांभाळली. एका वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याने स्थानिक पातळीवर पॅनेल, आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवली जात आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रितपणे प्रचार करणारे शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मात्र अनेक ठिकाणी एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
००
निकालानंतर दावे, प्रतिदावे
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष किंवा महाविकास आघाडीच्या नावाखाली लढवली जात नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात, एवढ्या ग्रामपंचायतींवर आमचाच झेंडा, असे दावे, प्रतिदावे पक्ष व नेत्यांकडून करण्यात येतात. निवडणूक निकालानंतर दावे, प्रतिदाव्यांवरूनही राजकारण तापते.
००००
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही. स्थानिक पातळीवर पॅनेल, आघाडीतर्फे निवडणूक लढवली जाते.
- चंद्रकांत ठाकरे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
०००
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी नाही. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीबाबत ठरवले जाईल.
- अॅड. दिलीपराव सरनाईक,
जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस
०००
ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढविण्यात येते. या निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही.
- सुरेश मापारी,
जिल्हाप्रमुख, शिवसेना