- सुनील काकडे
वाशिम : जिल्ह्याच्या निर्मितीला प्रदिर्घ कालावधी उलटला आहे; मात्र विकासाच्या बाबतीत हा जिल्हा आजही प्रचंड माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण, कायम असलेली बेरोजगारी, शिक्षण, कृषी, आरोग्य यासह ४७ पॅरामिटर्समध्ये जिल्ह्याची पिछेहाट झालेली आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढण्यासाठी पुढे यायला हवे. हा जिल्हा प्रगतिशिल आणि सर्वच क्षेत्रात समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न करावे. माझी या कामात खंबीरपणे साथ राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी केले.
शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार वसंतराव खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमीत झनक, तान्हाजी मुटकूळे, माजी आमदार विजयराव जाधव, माजी खासदार अनंतराव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खानझोडे, नरेंद्र गोलेच्छा, पुरूषोत्तम राजगुरू, जिल्हाधिकारी बुवनेश्वरील एस. यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी प्रामुख्याने कृषी, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याच्या विकासावर संभाषण केले. ते म्हणाले, मी मंत्री बनण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आज मात्र २२८ किलोमिटरचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात तयार झाला आहे. यासह विविध स्वरूपातील विकासकामांसाठी शासनाने आतापर्यंत ६,५२७ कोटी रुपये दिले असून ५,७८० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली; तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. सरकारला १० वर्षे पूर्ण होण्याआधी जिल्ह्यात १०,००० कोटींची कामे झालेली असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वाशिम हा ‘आकांक्षित’ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हा डाग पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्नत होणे आवश्यक आहे. उद्योगधंदे सुरू होवून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. याशिवाय प्रत्येकास दर्जेदार शिक्षण मिळण्याची पुरेशी सुविधा निर्माण व्हायला हवी. त्याकरिता हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कामाला लागणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
वाशिमात लॉजिस्टीक पार्क उभे करूऔद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याची पूर्णत: पिछेहाट झालेली आहे. त्यामुळेच बेरोजगारी वाढली असून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेनाशी झाली आहे. तथापि, देशभरात २ लाख कोटींचे लॉजिस्टीक पार्क उभारले जात असून वाशिममध्येही रेल्वे स्थानक परिसरात विनावापर पडून असलेल्या ५० एकर जमिनीवर असे पार्क उभारण्याची आपली तयारी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शेतकरी समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकतीलवाशिम जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या दूर व्हायला हव्या. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला, तो समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकू शकतील, असे गडकरी म्हणाले.
खारपाणपट्ट्यात झिंगेपालन करा; एकरी ३० लाख रुपये कमवाविदर्भातील अकोला, बुलढाणासह काही जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा वसलेला आहे. या पाण्यात शेतीपिके तग धरू शकत नाहीत; मात्र झिंगेपालनाचा व्यवसाय निश्चितपणे यशस्वी ठरू शकतो. राजस्थानात खाऱ्या पाण्यात झिंगेपालनातून एकरी ३० लाख रुपये उत्पन्न काढले जात आहे. तसाच प्रयोग येथील शेतकऱ्यांनीही करायला हवा. त्यासाठी खाऱ्या पाण्याचे तलाव तयार करू, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करूरिसोड तालुक्यातील मसलापेन येथे असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत गडकरींनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. तसेच आमदार लखन मलिक यांनी मांडलेली शेलूबाजार बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणीही तत्काळ मंजूर केली.