वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रेल्वे स्टेशनवर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवून ३० रुपये करण्यात आले होते. आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्याने हे दर पुन्हा १० रुपये करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाशिमच्या रेल्वेस्थानकावरून अकोला, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, नांदेड या महानगरांसह दिल्ली, पंजाब, हैदराबाद या राज्यांमध्ये जाण्यासाठी रेल्वेची सुविधा आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्याने दैनंदिन इंटरसिटी एक्स्प्रेस, डेमू पॅसेंजरही पूर्वीप्रमाणे धावायला लागली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करण्यात आले.
.............
(बॉक्स)
रोज १० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
वाशिम रेल्वे स्थानकावर आजही प्लॅटफॉर्म तिकिटांची फारशी विक्री होत नाही. अधिकांश नागरिक विना प्लॅटफॉर्म तिकीटच स्थानकांत प्रवेश करतात.
अशा लोकांची तपासणी व्हायला हवी; मात्र टी.सी. किंवा रेल्वे विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांकडून तशी तसदी घेतली जात नसल्याने दैनंदिन जेमतेम १० तिकिटांची विक्री होत आहे.
.................
वर्षभर होता ३० रुपयांचा भुर्दंड
कोरोना संकट काळात रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर वाढवून ३० रुपये केला. मध्यंतरी पूर्णत: आरक्षित; तर आता पूर्वीप्रमाणे एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि पॅसेंजर रेल्वे चालविण्यात येत आहेत. नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणाऱ्यांना ३० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. हा प्रकार सुमारे १५ महिने कायम राहिला. आता मात्र पुन्हा हे दर १० रुपये झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
..................
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
काचीगुडा-नरखेड
तिरुपती-अमरावती
जयपूर-हैदराबाद
जयपूर-सिकंदराबाद
नागपूर-कोल्हापूर
नांदेड-अमृतसर