स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगरुळपीर येथील पंचायत समीतीच्या सभागृहात कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दोन्ही न्यायाधीशांसह विविध मान्यवरांनी कायदे, व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकारांबाबत मार्गदर्शन केले. महिलांचे अधिकार, घरगुती हिंसाचाराविषयी, तसेच खोटे गुन्हे कसे दाखल करण्यात येतात, या विषयावरही जनजागृती करण्यात आली. कायद्याची अंमल बजावणी कशी करावी, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे, लोक अदालतीमध्ये प्रकरणाचा निपटारा सामंजस्याने केला जातो, असेही संवादाद्वारे नागरिकांना सुचविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.के. मेश्राम सह.दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, तर प्रमुख अतिथी म्हणून आर.एस. मानकर, दुसरे सह.दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर हे होते, तसेच ॲड.पी.आर. बंग, ॲड.बी.वाय. शुंगारे, ॲड.पी.एम. भगत, ॲड.एम.के. मुळे, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे आदींची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस.एन. सरकाळे यांनी, तर आभार प्रदर्शन ॲड.बी.वाय. शुंगारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.