वाशिम : जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिक तथा स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी, २ आॅक्टोबरला जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह प्रशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला. महापुरूषांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छतेचा संकल्प घेतला.
जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हास्तरावर आजपासून स्वच्छतेसंदर्भातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची सुरूवात करण्यात आली आहे. त्यात विशेषत्वाने ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. ‘मिशन अंत्योदय’अंतर्गत ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा उपक्रमासही थाटात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांमध्ये शाळा-महाविद्यालये, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी हिरीरीने सहभाग नोंदविल्याचे पाहावयास मिळाले.