लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या तालुक्यातील वटफळ येथील शेतकरी गजानन घोरसडे यांच्या शेतातील विहिरीत पडल्याची घटना २६ मे रोजी घडली. ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून या बिबट्याला जीवदान दिले.मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या आणि वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वटफळ जंगल परिसरात वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यक सोय केलेली नसल्यामुळे वन्यप्राणी आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे येत असल्याचे दिसून येते. वटफळ येथील शेतकरी गजानन गुरसाळे यांच्या जंगल परिसराला लागून असलेल्या विहिरीत बुधवारी दुपारी बिबट्या पडल्याची माहिती वन कर्मचारी वायकर यांना कळताच वन विभागाच्या रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून या बिबट्याला सहीसलामत बाहेर काढून जंगलात सोडले.