लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/पांगरी नवघरे : येथून जवळच असलेल्या शेलगाव बोदाडे येथील पंढरी काळे या शेतकºयाच्या शेतात बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा व पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू केली.शेलगाव बोंदाडे येथे २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजता पंढरी काळे व उद्धव वाझुळकर यांना बिबट्या दिसून आला. त्याच शेतात एक काळवीट मृतावस्थेत आढळून आले. या काळविटाची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा दाट संशय शेतकºयांसह गावकºयांनी व्यक्त केला. सकाळच्या सुमारास बिबट्याकडून काळविटाची शिकार होत असल्याचे दृश्य पाहिले, असे पंढरी काळे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे कर्मचारी झुंझारे व इतरांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा शोध सुरू केला. घटनास्थळावर पायाचे ठसे उमटले असून वन कर्मचाºयांनी त्याचे छायाचित्रही घेतले. शेलगाव बोंदाडे परिसरात बिबट्या आढळून आल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेलगाव बोंदाडे येथे एका प्राण्याने काळविटाची शिकार केल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. काळविटाची शिकार करणारा प्राणी हा वाघ किंवा बिबट नसून तडस असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. - सिध्दार्थ वाघमारे,वन परीक्षेत्र अधिकारी, मेडशी-- काळविटाची शिकार झाल्यानंतर तेथे पाहणी केली असता, आढळून आलेले पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे दिसून येते.-शिवाजी बळी, वन्यजीव प्रेमी मालेगाव--सोमवारी सकाळच्या सुमारास काळविटाची शिकार करताना मी बिबट्याला पाहिले आहे. परिसरात बिबट्या आढळून आल्याने भीतीचे वातावरण आहे. -पंढरी काळे,शेतकरी, शेलगाव बोंदाडे
बिबट्याने केली काळविटाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 3:45 PM