कारंजा लाड (जि. वाशिम): मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयाला चोहोबाजूंनी घाणीच्या विळख्यात घेरले आहे. या दुर्गंधीतच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असल्याचा विदारक प्रकार मंगरुळपीर येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे. या परिसराची साफसफाई करून महाविद्यालय परिसराला कुंपण भिंत बांधण्याऐवजी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या घडीला या विद्यालयात ११ वीला ९७ आणि १२व्या वर्गाला ७२ मिळून एकूण १७0 विद्यार्थी शिकत आहेत. या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लहानसहान व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या प्रवेशद्वारालगतच लघूशंका करण्यात येत असून, परिसरातील व्यावसायिक त्यांच्या दुकानातील घाणकचरा येथे टाकत असल्यामुळे या ठिकाणाला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या तारकुंपणाची पूर्ण मोडतोड करण्यात आली आहे. मागच्या बाजूला अगदी वर्गखोलीला लागून मोठे गटार तयार झाले आहे. वर्गखोल्यांच्या भिंतीला लागूनच काही महाशय प्रात:विधी उरकण्याचे कामही करतात. ही घाण आणि गटारामुळे येथे डुकरांचा मुक्त संचार असून, घाणीमुळे सुटलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांचा अगदी गुदरमरून जात असतानाही त्यांना त्या ठिकाणी बसून ज्ञानार्जन करावे लागते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेता शिक्षण विभागाने दखल घेणे आवश्यक आहे.
घाणीच्या दुर्गंधीत विद्यार्थ्यांना धडे
By admin | Published: August 12, 2015 12:38 AM